नगर : नगररचना विभागाविषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी विभागात सर्वेक्षण केले. त्यातही त्यांना तथ्य आढळल्याचा अहवाल तयार करत त्यांनी एकाच वेळी विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचारी व शिपाई अशा तेरा जणांची तातडीने तेथून अन्यत्र बदली केली. मात्र, या तुघलकी निर्णयाने नगररचना विभागाची तीन महिन्यांपूर्वी तारांबळ सुरू झाली.
ती अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. अडचणी कमी होण्याऐवजी त्यात वाढच होत असल्याने विभागप्रमुख असलेले नगररचनाकार स्वत:च त्रस्त झाले आहेत. त्यातून ते दीर्घकाळ रजेवर जाण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी बदलून आलेल्या एकाही अधिकारी-कर्मचाऱ्याला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अजूनही कामाचे आकलनच होत नाही. परिणामी फायलींचा निपटारा होण्याऐवजी रोज नव्या फायलींचा भरणा त्यात वाढत आहे.
परिणामी विभागात येऊन सातत्याने जाब विचारणारे अभियंते, नागरिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यातच नव्याने दाखल झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी नगररचनाकार यांच्याकडे कामच येत नसल्याची कैफियत मांडली. तसेच येथून पुन्हा मूळ जागी बदली करावी, असे आर्जव विभागप्रमुख म्हणून त्यांच्याकडे केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कामे करून घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
हेही वाचा - निम्म्या पंचायत समित्यांमध्ये महिलाराज
"सकाळ'मधून एक महिन्यापूर्वी म्हणजे 13 नोव्हेंबरला याच मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. त्यात नवी बांधकामे व ले-आउटचे परवाने, तसेच "टीडीआर'ची तब्बल अडीचशे प्रकरणे प्रलंबित असल्याचे वृत्तही प्रकाशित केले होते. त्यात आणखी भर पडली असून, आता सध्या किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याची माहिती विभागातील एकाही कर्मचाऱ्यास सध्या सांगता येत नाही. त्यातून महिन्यापूर्वी महापालिकेचा साधारण साडेपाच कोटी रुपयांचा महसूल अडकला होता. त्यात आणखी वाढ होऊन आता हा साधारण सहा कोटी रुपयांपर्यंतचा महसूल अडकला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त भालसिंग यांनी पुन्हा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या फाइल्स तयार केल्या होत्या. तथापि, त्या वेळी बदल्या प्रकरणांवरून आर्थिक देवाण-घेवाणीचे आरोप सुरू झाल्याने त्यांनी बदल्यांच्या फायलींवर सह्याच केल्या नाहीत. केवळ एकाच तांत्रिक कर्मचाऱ्याला पुन्हा विभागात पाठविले. विभागात किमान चार तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना एकच तांत्रिक कर्मचारी दिल्याने संपूर्ण नगर शहरातील फायली तपासण्यास त्यांनाही मर्यादा येत असल्याचे समोर येत आहे.
नगरमधील आर्किटेक्ट, इंजिनिअर्स व सर्व्हेअर्स असोसिएशनच्या सभासद असलेल्या 74 अभियंत्यांनी त्या वेळी महापौर व आयुक्तांची भेट घेऊन येथील अडचणींचा पाढाही वाचला होता. मात्र, त्यातही राजकारणाचा शिरकाव झाल्याने ही मागणी दुर्लक्षित झाली. एकाच ठरावीक अधिकाऱ्याचे नाव बदलीसाठी घेण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.
उड्डाणपूल, वाडिया पार्क अन् आता "आयुष'
नगररचना विभागासमोर सध्या शहरातील रखडलेल्या उड्डाणपुलाचे भूसंपादन, वाडिया पार्कसंदर्भात दाखल झालेली अवमान याचिका आणि आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आयुष हॉस्पिटल उभारणीत निर्माण झालेले अडथळे, हे तीन अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यातील तांत्रिक माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्यासमोर मांडताना विभागाची तारांबळ सुरूच आहे. विभागाचे नगररचनाकार राम चारठणकर व सहायक नगररचनाकार वैभव जोशी हे दोघेच फक्त तांत्रिक आहेत. त्यातही नगररचनाकार चारठणकर यांनीच यापूर्वी महापालिका स्तरावर काम केलेले नाही. त्यामुळे त्यांना अगोदर ते समजून घ्यावे लागते. तसेच बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागी आलेल्यांमध्ये एकही अनुभवी व्यक्ती नाही. त्यातून ही गुंतागुंत कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
नगररचना विभागात सध्या तांत्रिक मनुष्यबळच शिल्लक नाही. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर तीन महिन्यांपूर्वी आलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना अजूनही कामाचे आकलनच नाही. त्यात काहींनी कामच येत नसल्याची भूमिका मांडून पुन्हा बदलीची मागणी केली. त्यातून आणखी अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच फायलींचा निपटारा होण्याऐवजी त्यांची संख्या वाढत आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्तांना आता कल्पना देणार आहे. तांत्रिक मनुष्यबळ मिळाल्याशिवाय फायलींची संख्या कमीच होणार नाही. त्यातून महापालिकेचा महसूलही अडला आहे. मात्र, महसूल नेमका किती अडला आहे, हे सांगता येणार नाही.
- राम चारठणकर, नगररचनाकार, महापालिका, नगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.